अचानकपणे सरोजच्या जाण्याने औरंगाबादकर झाले दुःखी
औरंगाबाद, दि.४(सांजवार्ता ब्युरो) बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांच्याशी औरंगाबादकरांशी देखील अनोखे नाते जोडले गेले आहे. त्यांचे अचानकपणे जाण्याने औरंगाबादकर दुःखी झाले आहे. औरंगाबादमधील अनेक डान्सरला त्यांनी प्रोत्साहन दिले होते. त्यांच्यामुळे औरंगाबाद मधील अनेक कोरियोग्राफरला प्रेरणा मिळाली असल्याचे औरंगाबाद मधील कोरियोग्राफर यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना सांगितले.
औरंगाबाद मध्ये त्या 'डान्स औरंगाबाद डान्स' या कार्यक्रमासाठी सरोज खान या आल्या होत्या. त्यांच्या समोर अनेकांना आपले नृत्य सादर करण्याची संधी देखील मिळाली होती. अनेकांना त्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करून त्यांनी प्रोत्साहन देखील दिले होते. तर अनेकांना त्यांनी चांगले कोरियोग्राफर होण्यासाठी काही टिप्स देखील दिल्या होत्या. त्यामुळे औरंगाबादकरांशी देखील त्यांचे नाते जोडले गेले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने औरंगाबादकर देखील सुन्न झाले आहे.
सरोज यांच्या शाबासकीने मिळाली प्रेरणा: गितेश खंडाळे
औरंगाबाद मध्ये एका शो साठी बॉलिवूड मधील प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान आल्या होत्या. तेव्हा आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तेव्हा सरोज खान यांनी 'आप बहुत अच्छा कोरियोग्राफी करते हो, इसको आगे बढाओ.' अशी प्रेरणा दिली होती. तेव्हापासून त्यांची ही प्रेरणा आजही मला खूप काही शिकवीत असल्याचे कोरियोग्राफर गितेश खंडाळे यांनी सांगितले. त्यांच्या जाण्याने आज खूप मोठा कोरियोग्राफर आपण गमविला आहे. याची खंत वाटते. त्यांचे काम अत्यंत चोख होते, त्या खूप मन लावून काम करायच्या. आज हीच प्रेरणा मिळत असल्याचे गितेश यांनी सांगितले.
माझ्या मुलीला त्यांनी दिली होती शाबासकी:कैलास गंगावणे
२०१६ रोजी डान्स औरंगाबाद डान्स या शो साठी त्या औरंगाबाद मध्ये आल्या होत्या. माझी मुलगी ऋतुजाला सरोज खान यांच्या हस्ते पुरस्कार देखील मिळाला होता असे शहरात कैलास गंगावणे यांनी सांगितले. त्यांनी माझ्या मुलीला शाबासकी देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. इतकेच नव्हे तर मुबंई ला एकदा या... असे आमंत्रण देखील दिले होते. परंतु कधी जाणेच झाले नाही. अशी खंत देखील कैलास यांनी व्यक्त केली. परंतु त्यांनी दिलेली शाबासकी आणि प्रोत्साहन आजही खूप काही शिकविते. त्यांच्या आज आपल्यातून जाण्याने खूप दुःख वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांची भेट आजही आठवते: सूरज बनकर
बॉलीवूड च्या सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांच्या शी औरंगाबादकराचे देखील अनोखे नाते जोडले गेले आहे. मला आजही त्यांची भेट आठवते असे सूरज बनकर यांनी सांगितले. मुबंई ला त्यांची भेट झाली होती. तेव्हा त्यांनी दिलेली शाबासकी आजही मला प्रेरणा देते असेही सूरज यांनी सांगितले. त्यांच्या अचानकपणे जाण्याने खूप वाईट वाटत आहे. त्यांच्या आठवणीतून त्या नेहमी आम्हाला प्रेरणा मिळेल असेही सूरज बनकर यांनी सांगितले.












